Raj Thackeray Future CM: गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे बॅनर झळकलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, नेत्या सुप्रिया सुळे, तर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश झाला आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे. यानिमित्ताने शिवतीर्थ परिसरात मनसेने बॅनर लावले आहेत. महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असे ठळक अक्षरात या बॅनरवर लिहिले आहे. तसेच हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकूरही या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. याशिवाय पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. शिवतीर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन
राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावसे वाटत असेल तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसेच एखादे छोटेसे शैक्षणिक साहित्य आणा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, तुम्ही दिलेली झाडांची रोपे आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या विनंतीचा नक्की मान ठेवाल याची मला खात्री आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.