“जे मुद्दे मांडले, त्यावर CM एकनाथ शिंदे सकारात्मक”: राज ठाकरे; शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 07:00 PM2023-10-12T19:00:14+5:302023-10-12T19:04:23+5:30
Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत काय झाले, याबाबत राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील टोल, टोलनाके, टोलनाक्यांवरील सुविधा यांसह अनेकविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी बैठकीत काय ठरले, कोणते निर्णय झाले, याबाबत माहिती दिली.
मी तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट सांगतो. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सर्व अधिकारी, संबंधित मंत्री यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणे, यासाठी उद्या (१३ ऑक्टोबर) एक बैठक माझ्या घरी होणार आहे. ही बैठक सकाळी ८ वाजता होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, हे त्यानंतर सांगेन, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, या बैठकीत नेमके कोण कोण असणार आहे, याबाबत सविस्तर माहिती राज ठाकरे यांनी दिली नाही.
टोलसंदर्भात नेमका काय निर्णय होणार आहे, हे नंतर सांगू शकेन
टोलसंदर्भात नेमका काय निर्णय होतो, हे या बैठकीनंतर सांगू शकेन, असे सांगत राज ठाकरे यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. पोलिसांच्या घरासंदर्भातील मुद्दा या भेटीत उपस्थित करण्यात आला होता. यावर प्रश्न विचारला असता, त्याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. भेटीत मांडलेल्या मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत काय घडले?
राज ठाकरे यांनी राज्यातील टोलप्रश्नी अनेक मुद्दे मांडले. तसेच जनता जर रोड टॅक्स भरत असेल तर टोल कशासाठी घेता, असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. टोलची दरवाढ करण्यात आली आहे ती करू नये, अशी मागणी करण्यात आली. टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का, महिलांसाठी शौचालये का नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. टोल वसुलीच्या माध्यमातून युती सरकारच्या काळातील उड्डाणपूल आणि रस्ते बांधणीचा खर्च वसूल करण्यात येत आहे. मात्र, आता २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला.