४ पाऊले पुढे जाण्यासाठी राज ठाकरेंनी १ पाऊल मागे घेतलं; प्रवीण दरेकरांनी सांगितलं 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:19 PM2022-05-03T15:19:48+5:302022-05-03T15:20:03+5:30
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज यांनी सरकारला ३ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे.
मुंबई- अक्षय्य तृतीयेनिमित्त मनसेकडून आज राज्यभरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र सोमवारी राज ठाकरे यांनी महाआरती करण्याचा निर्णय रद्द केला. कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज यांनी सरकारला ३ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. ४ मेपासून गप्प बसणार नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी काल औरंगाबादच्या सभेतून दिला. उद्या देशभरात ईद साजरी होणार आहे. त्यासोबतच उद्या अक्षय्य तृतीयादेखील आहे. यानिमित्तानं मनसेकडून राज्यभरात आरत्यांचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र राज ठाकरे यांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे. तशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
राज ठाकरेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं आहे. राज ठाकरे सर्व गोष्टी शांततेत करत आहेत. त्यांनी आज एक पाऊल मागे घेतलं. मात्र याचा अर्थ राज ठाकरेंनी माघार घेतली, असं होत नाही. त्यांनी ४ पाऊले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ३ तारखेला ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला.
राज ठाकरे यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 'माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,' असं राज ठाकरे म्हणाले.
मशिदीतून सुरू झालेला भोंगा आताच्या आता बंद करा. नीट सांगितलेलं कळतच नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला. आम्ही ४ तारखेपासून अजिबात शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ती यांना दाखवावीच लागेल. देशातल्या हिंदूंना माझी विनंती आहे. ४ तारखेपासून ज्या ज्या मशिदींसमोर भोंगे दिसतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा आणि अनेक वर्षे जुना असलेला हा प्रश्न सोडवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.