किती काळ लाचारासारखं जगणार; राज ठाकरेंचा परप्रांतीयांच्या स्वाभिमानाला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 07:06 PM2018-12-02T19:06:28+5:302018-12-02T20:50:12+5:30

उत्तर भारतीयांच्या मंचावर राज ठाकरेंचं भाषण

mns chief raj thackeray at uttar pradesh bhartiya maha panchayat samitis programme | किती काळ लाचारासारखं जगणार; राज ठाकरेंचा परप्रांतीयांच्या स्वाभिमानाला हात

किती काळ लाचारासारखं जगणार; राज ठाकरेंचा परप्रांतीयांच्या स्वाभिमानाला हात

googlenewsNext

मुंबई: मुंबई: उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रोजगार आले नाहीत. ही चूक तिथल्या राजकारण्यांची आहे. तुम्ही याबद्दल तुमच्या राज्यातील राजकारण्यांना जाब विचारायला हवा. किती काळ तुम्ही असं लाचारसारखं जगणार?, असा सवाल उपस्थित करत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या स्वाभिमानाला हात घातला. आसाम असो वा गुजरात असो, प्रत्येक राज्यातून तुम्हाला हाकलून देण्याची भाषा केली जाते. त्यासाठी आंदोलनं होतात. यामुळे तुम्हाला अपमानित झाल्यासारखं वाटत नाही का?, असा प्रश्नदेखील राज यांनी उत्तर भारतीयांना विचारला. ते उत्तर भारतीय महापंचायत समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कायम उत्तर भारतीयांवर बरसणारे राज प्रथमच उत्तर भारतीयांच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.




राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात हिंदीतून केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण हिंदीत होतं. माझं भाषण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दाखवलं जाणार आहे. माझी भूमिका तिथल्या लोकांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतील, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मी हिंदीत बोलत असल्याचं राज यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं. मी इथं कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलेलो नाही; मी इथे फक्त माझी भूमिका हिंदीत सांगायला आलो आहे, असं राज यांनी पुढे म्हटलं. 




मी उत्तर भारतीयांच्या स्थलांतरावर, परप्रांतीयांच्या लोंढ्यावर बोललो की मला स्थलांतर कायदा सांगितला जातो. मात्र अनेकांना हा कायदाच पूर्णपणे माहिती नाही. तुम्हाला जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल, की सर्वप्रथम तुम्हाला त्या राज्यातील पोलीस ठाण्यात जाऊन तुमची माहिती द्यावी लागते. तुम्ही कुठून आलात, तुम्ही इथे काय करणार आहात, कुठे नोकरी करणार आहात, याची सविस्तर माहिती पोलिसांना देणं अपेक्षित असतं. मात्र असं काहीच होत नाही, असं राज यांनी सांगितलं. प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची एक क्षमता असते. मुंबईची लोकांना सामावून घेण्याची क्षमता केव्हाच संपली आहे. त्यामुळे स्थलांतरं थांबायला हवीत, असं राज यांनी म्हटलं. 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

- मेरे भाईयों और बहनों; राज ठाकरेंची हिंदीतून भाषणाला सुरुवात
- शाळेपासून माझं हिंदी उत्तम- राज
- माझे वडिल उत्तम हिंदी बोलायचे- राज
- हिंदी राष्ट्रभाषा नाही, तसा निर्णय कधीच झालेला नाही- राज
- हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दाखवलं जाणार असल्यानं हिंदीत बोलतोय- राज
- अनेकांना राज्यांतर्गत स्थलांतराचा कायदाच माहिती नाही- राज
- एखादी व्यक्ती परराज्यातून येत असेल, तर तिनं राज्यात आल्यावर तिची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यायला हवी, असा कायदा सांगतो- राज
- स्थानिकांना नोकरीत प्राधान्य असायला हवं. त्यात गैर काय?- राज
- बिहार, उत्तर प्रदेशात उद्योग आले नाहीत, त्यात चूक तिथल्या राजकारण्यांची- राज
- देशाचे 70 टक्के पंतप्रधान उत्तर भारतातले होते- राज
- दुसऱ्या राज्यात गेल्यावर तिथली भाषा शिकायला हवी- राज
- महाराष्ट्रात जे घडलं, त्याचं चुकीचं वार्तांकन हिंदी प्रसारमाध्यमांनी केलं- राज
- बाकीच्या राज्यांमध्ये उत्तर भारतीयांवर अत्याचार होतात, तेव्हा कोणी काहीच बोलत नाही- राज
- महिन्याभरापूर्वी गुजरातमधून उत्तर भारतीयांना हाकललं, त्यावेळी कोणीच काही बोललं नाही- राज
- रेल्वे भरतीच्या जाहिराती फक्त उत्तर भारतातील वर्तमानपत्रांमध्ये दिल्या- राज
- रेल्वेमंत्र्यांना निवेदनं देऊनही उपयोग झाला नाही- राज
- प्रत्येक राज्यात तुम्हाला अपमानित केलं जातं, असं तुम्हाला वाटत नाही का?- राज
- तुम्ही तुमच्या नेत्यांना याबद्दल विचारत नाही का?- राज
- अनेक मराठी माणसं प्रामाणिकपणे, कायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत- राज
- आमची माणसं फेरीवाल्यांना समजवायला गेली, त्यांनी उर्मटपणे उत्तरं दिली. त्यामुळे संघर्ष पेटला- राज
- एकदा आत्मचिंतन करा, समस्या कळेल- राज
- मराठा माणसांनी हे राज्य घडवलंय- राज
- उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगडमधून दररोज 48 ट्रेन महाराष्ट्रात येतात अन् रिकाम्या परत जातात- राज
- प्रत्येक राज्याची एक क्षमता असते- राज
- राज्यात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांचं कनेक्शन उत्तर भारतात- राज
- बाहेरुन येणाऱ्या मुस्लिमांमुळे दंगली होतात, स्थानिकांमुळे दंगली होत नाही- राज
- बाहेरुन येणाऱ्या लोकांचे अत्याचार आम्ही सहन करायचे का?- राज
- माझे अनेक मित्र उत्तर भारतीय, ते उत्तम मराठी बोलतात- राज
- तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा, इथली लोकसंख्या प्रचंड वाढलीय. आता येऊ नका- राज
- आधी दक्षिण भारतातून लोक यायचे, तिथे रोजगार आल्यावर स्थलांतर थांबलं- राज
- जिथे जाल तिथली भाषा शिका, तिथल्या संस्कृतीचा आदर करा- राज
- अनेक मराठी तरुणांकडे रोजगार नाही- राज
- वृत्तवाहिन्या टीआरपीसाठी राज्याराज्यांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात- राज
- मोदी मुख्यमंत्री असताना वेगळं बोलायचे, आता वेगळं बोलतात- राज
- महाराष्ट्राकडून केंद्राला 100 रुपये गेले की वरुन फक्त 13.20 रुपये मिळतात- राज
- बिहारमधून केंद्राला 100 रुपये गेल्यावर तब्बल 129 रुपये मिळतात- राज
- राज्याराज्यांमध्ये निकोप स्पर्धा असायला हवी- राज
- अमिताभ यांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम वाटतं, तर राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल प्रेम वाटणारच. त्यात गैर काय?- राज

Web Title: mns chief raj thackeray at uttar pradesh bhartiya maha panchayat samitis programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.