मुंबई: राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवसेना-भाजप यांच्यात दुरावा आल्यानंतर भाजप-राज ठाकरेंची जवळीक झाली. त्यात आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. भाजप-मनसे यांच्यात हिंदुत्वावरून एकमत झाले आहे. ही भेट जवळपास दोन तास चालल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.
देवेंद्र फडणवीसांना ओवाळतानाचा फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. यावेळी फोटो काढताना असे काही झाले की, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शर्मिला वहिनींना हसू आवरले नाही. हा हास्यविनोदही कॅमेरात कैद झाला. 'दोन वेळा काही खाऊ शकता का तुम्ही?' असा प्रश्न शर्मिला ठाकरेंनी ओवाळताना विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, की 'हो अगदीच'. त्यानंतर शर्मिला यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण केले.
राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही हसू आवरलं नाही
शर्मिला ठाकरे ओवाळणीचे ताट ठेवण्यासाठी शर्मिला ठाकरे वळत होत्या, इतक्यात कोणीतरी त्यांना फोटोसाठी पोझ देण्यासाठी थांबायला सांगितले. त्यामुळे त्या 'सॉरी' म्हणत थांबल्या. मात्र, दिवा आपल्याकडे असल्याचे लक्षात येताच त्यांनी औक्षणाची थाळी फिरवली. या गडबडीमुळे शर्मिला ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि बाजूला उभ्या असलेल्या राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही हसू आवरले नाही.
राज ठाकरेंचे देवेंद्र फडवीसांना पत्र
देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवले होते. या पत्रातून राज यांनी फडणवीसांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांना फोन करून आभार मानल्याचे सांगितले. त्याचसोबत मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगत त्यातून काही राजकीय अर्थ काढू नका असेही फडणवीसांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असेल अशा चर्चा सुरू झाल्यात. कारण मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्ष निवडीत, बहुमत चाचणी आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला साथ देणार आहे. त्यामुळे मनसे-भाजप एकत्र येणार असे बोलले जात आहे. त्यात नुकतेच राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेणार असल्याची बातमी समोर आली. मात्र राज यांनी या वृत्ताचं खंडन केले. मात्र राज-फडणवीस यांच्या भेटीने नक्कीच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.