मुंबई: मनसे आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करत असताना औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी करत शिवसेनेचा मुद्दा हायजॅक केला होता. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसीय औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी उचलून धरत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातच आता मनसे शिवजयंती तिथीनुसारच साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. मागील सरकारमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती. इतकचं नाही तर शिवसेनेचे माजी खासदार यांनी चंद्रकांत खैरै यांनी सांगितले होते की, शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली होती. तसेच तिथीनूसार देखील शिवसेना शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते. मात्र मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी १२ मार्चला तिथीनूसार शिवजयंती साजरी करणार आहे. तसेच राज ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान चंद्रकांत खैरे तुमचा राज्यात मुख्यमंत्री आहे. तसेच येत्या दोन महिन्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही केले केले नाही तर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकांच्या काळात संभाजीनगर नाव घेऊन प्रचाराला येता येणार नाही. मतदान मागता येणार नाही. तसेच दोन महिन्यात जर संभाजीनगर नाव केले नाही तर संभाजीनगरमध्ये फिरु देणार नाही असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांना दिला आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी होती. संभाजीनगर नावाची मागणी मनसे करतेय त्यांनी हा मुद्दा टिकवला पाहिजे. कारण त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. मनसे आता बोलायला लागली आहे. आम्ही आधीपासून संभाजीनगर बोलतो. आता अधिकृतपणे मुख्यमंत्री निर्णय घेतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक उडणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसून येत आहे.