मुंबई: राज्यात गेल्या महिनाभरापासून सत्तासंघर्षाचे नाट्य रंगलं आहे. शिवसेना-भाजपा यांच्यातील युती तुटून राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. मागील काही दिवस सुरु असलेल्या या नाट्यानंतर मनसे आता पुन्हा सक्रीय होणार आहे.
पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर 20 व 21 डिसेंबर रोजी होणार असून मनसे प्रमुख राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या शिबीरमध्ये पक्षबांधणी आणि पुढील वाटचालीबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ १ जागा जिंकता आली. मनसेने या निवडणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले.
मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असला तरी मुंबई, ठाणे पट्ट्यात काही जागांवर मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. विक्रोळी, मुलुंड, मागाठणे, भिवंडी ग्रामीण, दादर-माहिम, ठाणे, शिवडी, डोंबिवली या मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती.
पुण्यातील कोथरुड मतदार संघातील भाजपाचे नेते व उमेदवार चंद्रकांत पाटील यांना मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी कढवी झुंज दिली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांचा 25 हजार मतांनी विजय झाला होता.