शिवसेनेला धक्का अन् भाजपाला साथ; राज ठाकरे पुन्हा सक्रिय, ४ मार्चला नाशिकचा दौरा करणार
By मुकेश चव्हाण | Published: March 2, 2021 09:25 AM2021-03-02T09:25:07+5:302021-03-02T09:38:51+5:30
महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा मनसे (MNS) टाळी देणार आहे.
मुंबई/ नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या दौऱ्यावेळी राज ठाकरे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनते इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. काही दिवसांआधी नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला होता.
मनसेप्रमुख राज ठाकरे ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर; पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/4HqQXOWMM4
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2021
महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे. नाशिकमध्ये स्थायी समितीत समसमान संख्याबळामुळे भाजापाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला मनसेने जोरदार झटका दिला आहे.
महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. मनसेचा एकमेव सदस्य सलीम शेख हे भाजपाच्या गोटात सहभागी झाल्याने भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे. स्थायी समितीत आता भाजपाचे आठ सदस्य असून विरोधकांपैकी शिवसेनेचे पाच तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे एकेक सदस्य म्हणजे आठ सदस्य आहेत. परंतु महापौर निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिल्याने आताही मनसेचे सलीम शेख हे भाजपाबरोबरच जातील असे मानले जात आहे, त्यामुळे मनसे किंगमेकर मानली जात आहे. तसेच भाजपाशी मैत्रीचे नाते आहेच, परंतु महापालिका निवडणूकीनंतर ते अधिक घट्ट होऊ शकते.
नाशिकमध्ये भाजपाची सत्ता आली त्यानंतर महापालिकेतही सत्ता आली हे सर्व राज्यातील सत्तेचे फलीत होते आणि अशा प्रकारच्या सत्तेची फळे चाखण्यासाठी मनसेसह सर्वच पक्षातील आयाराम दाखल झाले होते. राज्यातील सत्तातरांनंतर आता त्यांनाहीच फळे कडू लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीत ज्या प्रमाणे मनसेची एकेक करीत साथ सोडून गेले तसेच काहीसे भाजपाचे होईल असे मानले जात आहे. ते खरे ठरलेच तर महापालिकेच्या निवडणूकीत काहीही होऊ शकते. मनसे आणि भाजपा यांची गणिते अशावेळी जुळू शकतील, असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.
नाशिक महापालिकेमधील स्थायी समितीतील पक्षनिहाय सदस्य-
भाजपा- गणेश गिते, रंजना भानसी, हिमगौरी आडके, योगेश तथा मुन्ना हिरे, प्रतिभा पवार, इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर आणि मुकेश शहाणे
शिवसेना - सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडकेर, ज्योती खोले, केशव पेारजे, रत्नमाला राणे
मनसे - सलीम शेख
राष्ट्रवादी - समीना मेमन
काँग्रेस - राहूल दिवे