मुंबई: महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तयारीला लागली आहे. मनसेकडून महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी करण्यात येत आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) विविध ठिकाणी जाऊन मनसेच्या शाखेचं उद्घाटन करताना दिसून येत आहे. आज देखील प्रभादेवी येथील शाखा क्रमांक २०१चे उद्धाटन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
राज ठाकरे यावेळी म्हणाले की, आज काही भाषण करणार नाही. व्यासपीठावर तुमचं दर्शन घ्यायला आलो. कारण खालून दर्शन होत नाही. निवडणूक लागतील कधीही कदाचित याच महिन्यात घोषणा होईल, पण अजून तरी या वातावरणात निवडणूक वाटत नाही. आता निवडणुका लागल्यावर सगळ्यांची पाक-पाक सुरू होईल, तेव्हा आमचीही सुरू होईल, असं राज ठाकरेंनी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
मनसेची ही शाखा आहे. दुकान नव्हे, इथं आल्यावर न्याय मिळायला हवा, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तसेच एक पाठी सगळ्या शाखेला मी देणार आहे. तीच पाटी राज्यातील प्रत्येक मंत्र्याला देखील पाठवणार आणि ते लावायला सांगणार आहे. या पाटीत 'कारभार ऐसें करवा की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये', या संदेशाचा प्रत्येक जण तंतोतंत पालन करेल, अशी अपेक्षा आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले होते.