Raj Thackeray Ayodhya Visit: अयोध्येतील महंत पोहचले ‘शिवतीर्थ’वर; प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचे राज ठाकरेंना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 01:47 PM2022-10-10T13:47:13+5:302022-10-10T13:47:50+5:30
Raj Thackeray Ayodhya Visit: अयोध्येला येणार असल्याची ग्वाही राज ठाकरेंनी दिल्याची माहिती महंतांनी दिली.
मुंबई: काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा (Ayodhya Visit) स्थगित केला होता. यातच भाजप नेते आणि खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. मात्र, अयोध्येतील महंतांनी थेट मुंबई गाठत राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. यावेळी महंतांनी राज ठाकरे यांना अयोध्येला येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी निमंत्रित केल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना अयोध्येला निमंत्रित करण्यासाठी अयोध्येतील हनुमान गढी येथील महंत राजुदास महाराज,महंत धरमदास आणि विश्व हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी हे मुंबईत आले होते. या सर्वांनी राज ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर भेट घेतली. या महंतांनी राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महंतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्याशी आमची चांगली भेट झाली. या भेटीवेळी विविध विषयांवर चर्चा झाली. आम्ही त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे, असे महंत राजुदास महाराज यांनी सांगितले. तसेच काही दिवसांआधीच मी अयोध्येला येणार होतो. पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही.पण मी आता येईन, अशी ग्वाही राज ठाकरेंनी दिली, अशी माहितीही महंत राजुदास महाराज यांनी यावेळी बोलताना दिली. काही महिन्यांपूर्वी बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. उत्तर प्रदेशवासीयांची राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी आधी माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावे, असे आव्हान सिंह यांनी दिले होते.
दरम्यान, मागील वेळी काही गैरसमज झाल्यामुळे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र यावेळी आंदोलन होणार नाही. सगळे गैरसमज दूर झाले आहेत. राज ठाकरे सनातन धर्माच्या पुढे जात आहेत. म्हणून त्यांना अयोध्येला बोलावायचे आहे, असेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"