राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:25 PM2021-03-08T19:25:53+5:302021-03-08T19:26:42+5:30
corona vaccine: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कुटुंबीयांनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना लस देण्यात येत आहे. यात देशातील अनेक महत्वाचे नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कुटुंबीयांनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मुंबईतील बीकेसी येथील कोरोना केंद्रात त्यांनी लस घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सोबत उपस्थित होत्या.
राज्यातील महत्वाच्या नेत्यांनीही घेतली लस
१ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर देशासह राज्यातही महत्वाच्या नेत्यांनी कोरोनाची लस घेतली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील जेजे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. शरद पवार हे राज्यात कोरोनाची लस घेतलेले पहिले राजकीय नेते ठरले. पवार यांच्यासोबतच त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लस घेतली.