राज ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 06:41 PM2022-04-17T18:41:23+5:302022-04-17T18:41:36+5:30
राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यभर कार्यकर्त्यांची संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे.
आगामी ५ जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज केली. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज ठाकरेंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.
राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या राज्यभर राज ठाकरे यांनी भोग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच राजकारण तापले असून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा समोर आला आहे. मात्र राज ठाकरे किती सभा घेऊन महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करतील त्याचा फरक महाविकास आघाडीवर पडणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यभर कार्यकर्त्यांची संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच निमित्ताने साताऱ्यातील वाई मतदार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याच्या वेळेला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंतर पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही- राज ठाकरे
"आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.
भोंग्याचा त्रास मुस्लिमांनाही- राज ठाकरे
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय."