'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:57 AM2019-01-27T11:57:59+5:302019-01-27T12:22:38+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर हजर राहणार आहेत. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
आज दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित आणि मिताली विवाहबद्ध होत आहेत. कृष्णकुंज आणि इतर परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची उपस्थिती असणार आहे. तसेच अंबानी परिवार आणि रतन टाटा हे देखील उपस्थित राहणार आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूडमधील कलाकारही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच लहानपणीची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्यासोबत अमित यांचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे 11 डिसेंबर रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवशीच दोघांचा साखरपुडा झाला होता. आपल्या भाषणांसोबत राज ठाकरेंना व्यंगचित्रासाठीही ओळखलं जातं. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे टॅलेंट आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात.
कोण आहे मिताली बोरूडे?
मिताली आणि अमित ठाकरे हे बालमित्र आहेत. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. मिताली फॅशन डिझायनर आहे. प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरूडे यांची ती कन्या आहे.