मोदींची नव्या थापांची पतंगबाजी; राज ठाकरेंचं 'संक्रांत विशेष' व्यंगचित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 12:42 PM2019-01-15T12:42:28+5:302019-01-15T12:56:57+5:30
राज ठाकरेंकडून मोदींच्या आश्वासनांची खिल्ली
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत आहेत. 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला आहे.
मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच संसदेत याबद्दलचं विधेयक मंजूर करुन घेण्यात आलं. मात्र अनेक घटनातज्ज्ञांनी हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला. त्यावरुन मोदींची नवी थाप असं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे. मोदी अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत पतंग उडवत आहेत. त्या पतंगावर 'नव्या थापा 10% आरक्षण' असा मजकूर आहे. मोदी आणि आसपासचा गोतावळा आनंदानं पतंग उडवत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रात दाखवलं आहे. मात्र त्याच गच्चीवर असलेल्या भाजपनं याकडे पाठ फिरवली आहे.
सवर्ण आरक्षणाच्या थापेचा पतंग आकाशात उडत असताना काही जुने पतंग मात्र गच्चीवर पडून आहेत. त्यातीत प्रत्येक पतंगावर मोदींची आश्वासनं, त्यांचे निर्णय आणि योजनांचा उल्लेख आहे. मेक इन इंडिया, नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीवर पडल्याचं चित्र राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात दाखवलं आहे. मोदी केवळ थापांचे पतंग उडवतात. प्रत्येकवेळी नव्या थापा मारतात, असं राज यांनी व्यंगचित्रातून सुचवलं आहे.