मनसे-काँग्रेस राडा प्रकरण : विक्रोळीला छावणीचे स्वरूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:56 AM2017-11-28T05:56:42+5:302017-11-28T05:56:58+5:30
विक्रोळीत मराठी पाटी आंदोलनादरम्यान मनसे-काँग्रेसमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत काँग्रेसच्या २ तर मनसेच्या ४ कार्यकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : विक्रोळीत मराठी पाटी आंदोलनादरम्यान मनसे-काँग्रेसमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत काँग्रेसच्या २ तर मनसेच्या ४ कार्यकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, सोमवारीही विक्रोळी परिसरात तणावाचे वातावरण कायम होते. या घटनेनंतर विक्रोळीत जमावबंदीचे आदेश देत, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विक्रोळीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगर क्रमांक ३ मध्ये रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मराठी पाट्यांचे निवेदन देण्यासाठी मनसेचे ढोलम हे त्यांच्या ८ ते ९ कार्यकर्त्यांसोबत या परिसरात दाखल झाले. याचाच राग मनात धरत, काँग्रेसचे पदाधिकारी अब्दुल्ला आणि रिझवान यांनी १० ते १५ जणांच्या फेरीवाल्यांसोबत त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात विश्वजीत ढोलम गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह विजय मारुती येवले, प्रमोद सावंत आणि उपेंद्र सावंत जखमी झाले. त्यांना विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचे समजताच, पूर्व उपनगरासह मुंबई शहरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सामानाची तोडफोड करत, जो दिसेल त्याला मारहाण सुरू केली. याच दरम्यान, एक जमाव त्यांच्या दिशेने आला. काचेच्या बाटल्या, काठीने त्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. यामध्ये मनसे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत विक्रोळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीपासून पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला. विक्रोळीतील प्रमुख, तसेच संवेदनशील ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ७ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी या वेळी बंदोबस्तासाठी उतरले. सिंग हे स्वत: सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ढोलम मारहाण प्रकरणात अब्दुल्ला आणि रिझवानला बेड्या ठोकल्या आहेत, तर दंगल घडविल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी जयंत दांडेकर, किसन गावकर, संतोष देसाई, अशोक जाधव या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयाबाहेर घोषणाबाजी...
सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन्ही गुन्ह्यातील अटक आरोपींना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी मनसे आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात दाखल झाले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांनी न्यायालय परिसरात घोषणाबाजी सुरूकेल्यामुळे तणाव वाढला.
मनसे कार्यकर्त्यांची रात्र कोठडीत
न्यायालयाने मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविली. मात्र, न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने, त्यांच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे त्यांना सोमवारची रात्र कोठडीत काढावी लागली, तर रिझवान आणि अब्दुल्ला यांना विक्रोळी न्यायालयाने २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी करणार
येत्या शुक्रवारपासून अनधिकृत फेरीवाला प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पत्र स्थानिक महापालिका आणि पोलीस अधिकाºयांना देऊन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा आग्रह धरला जाणार आहे.
सुरुवातीला पत्र आणि निवेदनांच्या मार्गाचा अवलंब करायचा. त्यानंतरही फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत विरोधकांचे उट्टे काढायचे धोरण मनसे राबविण्याची शक्यता आहे.