मुंबई - कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. तसेच, गणेशोत्सव सणानिमित्त निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यावरुन, मनसेनं पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर जबरी टीका केलीय.
"महाराष्ट्रात करोनाच एवढं स्तोम माजवल जातंय की, यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारने कोरोना संबधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे" असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या सध्या रोज साडेचार ते पाच हजार आहे. रोज २० हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघू लागतील, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करावा लागेल. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. रोज ३० हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर त्यांना व्यवस्थित हाताळण्यात वैद्यकीय यंत्रणा आज सज्ज आहे. मात्र, ही संख्या रोज ४० हजार अशी होऊ लागली, तर मात्र परिस्थिती बिकट होईल. बेड, ऑक्सिजन, औषधी यांची अडचण निर्माण होईल. परिणामी मृत्यूदरही वाढेल असेही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले आहे.
गर्दी होईल असे कार्यक्रम राष्ट्रवादीकडून बंद
गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाने मनाई केली आहे. तसे कार्यक्रम होणार नाहीत, ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
थोडीशी बेफिकिरी पडू शकते महागात
गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर लोक प्रवास करीत आहेत. आताच नियम पाळले नाहीत, तर तिसऱ्या लाटेला कोणीही रोखू शकणार नाही. थोडी बेफिकिरी राज्याला प्रचंड मोठ्या संकटात टाकू शकते, याची जाणीव लोकांना करून देण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे, असेही एका वरिष्ठ सचिवांनी स्पष्ट केले.