मनसेच्या नगरसेवकाला भांडुपमध्ये मारहाण
By admin | Published: June 13, 2014 01:50 AM2014-06-13T01:50:42+5:302014-06-13T01:50:42+5:30
भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रूपेश वायंगणकर यांना काल रात्री दोन गर्दुल्ल्यांनी मारहाण केली.
मुंबई : भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रूपेश वायंगणकर यांना काल रात्री दोन गर्दुल्ल्यांनी मारहाण केली. यानंतर वायंगणकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांना जबर मारहाण केल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.
वायंगणकर यांच्या दाव्यानुसार, सर्वोदयनगर परिसरात गर्दुल्ल्यांचा अड्डा आहे. या गर्दुल्ल्यांमुळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत आल्या होत्या. हा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी वायंगणकर तेथे गेले. तेव्हा शाब्दिक चकमकीनंतर प्रसाद बाणे ऊर्फ टेण्या, नैनेश सुर्वे ऊर्फ नान्या या दोघांनी वायंगणकर यांच्यावर हल्लाबोल केला. काही वेळाने वायंगणकरांच्या कार्यकर्त्यांनी या दोघांना मारहाण केली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
भांडुपच्या राजकीय पटलावर कोणतेही अस्तित्व नसताना नशिबाच्या जोरावर नगरसेवक झालेल्या वायंगणकर यांच्याबद्दल पक्षात नाराजी असल्याचे समजते. विभागात कामे न केल्याबद्दलही सर्वसामान्यांचा त्यांच्यावर रोष आहे. यातूनही हा हल्ला झाल्याची चर्चा विभागात आहे. (प्रतिनिधी)