मनसे नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Published: February 6, 2017 03:32 AM2017-02-06T03:32:35+5:302017-02-06T03:32:35+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात झाली असतानाच मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्याविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे

MNS corporator gets molestation charge against | मनसे नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

मनसे नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

googlenewsNext

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात झाली असतानाच मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्याविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लील मॅसेज पाठवून नंतर धमकाविल्याची तक्रार त्यांच्या प्रभागातील एका विवाहितेने केली आहे. या तक्रारीची शहानिशा करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दादरमधील प्रभाग क्र. १९२ हा महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने सुधीर जाधव यांची पत्नी स्नेहल जाधव या मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या तक्रारीचा वापर विरोधकाकडून प्रचारात होण्याची शक्यता आहे.
संबंधित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २८ जानेवारीला सायंकाळी मी बाहेर असताना जाधव कार्यअहवाल घेऊन घरी आले होते. तेव्हा मी घरी नसल्याने पतीने आपल्या मुलीला चहा बनविण्यास सांगितले. मी घरी येईपर्यंत बिल्डिंगमध्ये ते अन्य ठिकाणी प्रचारासाठी गेले. औपचारिकता म्हणून त्यांच्या कार्यअहवालावर दिलेल्या मोबाइल नंबरवर आपण फोन करून चहासाठी बोलाविले. मात्र तेव्हा अन्यत्र गेलो असे सांगून नंतर येऊ, असे ते म्हणाले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेनऊनंतर व्हॉटसअ‍ॅपवर तुझा डीपी सुंदर आहे, तुझा फुल फोटो पाठव, असा मॅसेज त्यांनी पाठविला. त्यास नकार दिला असता पहाटे ४ वाजेपर्यंत ते फोटोची मागणी व व्हॉटसअ‍ॅप कॉल करीत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक संतोष नावाची अनोळखी व्यक्ती मोबाइलवर फोन करून बिल्डिंगमध्ये भेटण्यासाठी आली. सुधीर जाधव यांचे मॅसेज डिलीट करून टाक, तो फार मोठा माणूस असून विषय वाढवू नकोस, महागात पडेल, असे धमकाविले. त्यानंतर मी दादर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तुला किती पैसे पाहिजेत ते सांग, राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही, असे सांगत पुन्हा धमकाविल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
संबंधित महिलेने तक्रार अर्जासमवेत मोबाइलवर आलेल्या व्हॉटसअ‍ॅप मॅसेजच्या प्रिंट जोडल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांतीलाल जाधव यांनी प्रकरणाची शहानिशा करण्यात येत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: MNS corporator gets molestation charge against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.