Join us

"महोदय गोड बोलता बोलता नववर्ष आलं पण...", वीज बिलांवरून मनसेची बॅनरबाजी

By जयदीप दाभोळकर | Published: January 01, 2021 5:35 PM

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे बॅनर, अनोख्या शब्दांत दिल्या शुभेच्छा

ठळक मुद्देकोरोनाकाळातील वाढीव वीज बिलांवरून मनसेचा आक्रमक पवित्रा

कोरोना काळातील राज्यात निर्माण झालेला वीजबिलाचा प्रश्न अद्यापही मिटलेलना नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोरोनाकाळातील वीजबिलांवरून आक्रमक पवित्रा घेतला असून वाढीव वीज बिलांबाबत मनसेनं मुख्यमंत्र्यांनाही सवाल केला आहे. "मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?," अशा आशयाचे बॅनर मनसेनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर लावले आहेत. "मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?" असं म्हणत मनसेनं पुन्हा एकदा वीज बिलांच्या मुद्द्याची आठवण करून दिली आहे. तसंच या बॅनरवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.  लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांना वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली होती. त्यानंतर या विरोधान मनसे आणि भाजपानं आंदोलनही केलं होतं. यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही तसे संकेत दिले होते. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसंच अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मनसेनं वाढीव वीज बिलांचा विचार करण्याची मागणी केली होती. तसंच दुसरीकडे भाजपानंही वीज बिलांची होळी करत वीज बिलं माफ करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही यावर ठोस निर्णय न झाल्यानं मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत वाढीव वीज बिलांवरून निशाणा साधला.

टॅग्स :मनसेउद्धव ठाकरेशिवसेनानितीन राऊत