Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा रविवारी नागपूर येथे पार पडला. या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळात संधी न दिल्याने काही आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही आमदार अधिवेश सोडून आपल्या मतदारसंघात पोहोचले आहेत. यावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशा आमदारांवर निशाणा साधला आहे.
मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, अनिल पाटील, तानाजी सावंत, प्रकाश सोळुंके यांच्यासह काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अधिवेश सुरु असतानाच छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, प्रकाश सोळुंके, रवी राणा, विजय शिवतारे हे आपपाल्या मतदारसंघात परतले होते. यावरुनच आता मनसेने जोरदार टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी एक्स पोस्टवरुन नाराज आमदारांवर निशाणा साधला आहे. हा मतदारांशी एक प्रकारचा द्रोह असल्याचे योगेश खैरे यांनी म्हटलं आहे.
"मंत्रिपदाची संधी ना मिळाल्याने अनेकजण नाराज होऊन अधिवेशनाला उपस्थित न राहता मतदारसंघात परतले अशा बातम्या येत आहेत. यांना त्या मतदारसंघातील लोकांनी मंत्री होण्यासाठी मतदान केलेलं नाही. कायदेमंडळात कायदे बनवणे आणि मतदारसंघातील प्रश्न मांडणे यासाठी यांना विधानसभेत पाठवले आहे. मंत्री पद मिळालं नाही म्हणून अधिवेशन सोडून जाणे हा ज्या मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले त्यांच्याशी एक प्रकारचा द्रोह आहे," असं योगेश खैरे यांनी म्हटलं.
फेसबुक डीपी बदलला, शिवसेना नाव हटवलं; तानाजी सावंत कमालीचे नाराज
आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलला होता. तसेच तानाजी सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव देखील काढलं. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाइल सावंत यांनी हटवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला होता. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.