एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा?; मनसेची आशिष शेलारांना चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:35 PM2019-04-01T17:35:40+5:302019-04-01T17:40:41+5:30
निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांची प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.
मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांची प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. काँग्रेस आघाडी आणि भाजपा युतीचे नेते एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मनसेनं लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका जाहीर केली असली तरी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सांगितलं आहे. त्यातच आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर वॉर रंगले आहे.
दोन दिवसांपूर्वी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्यासोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मनसैनिकांसह सहभागी झाले. यावरुन आशीष शेलार यांनी शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला असे सांगत मनसेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटवरुन पुन्हा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आशिष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी केलेल्या ट्विटला मनसेनंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार ट्विटरवरून म्हणाले होते की,
'शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शून्याला भेटला..
गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..
पण उपयोग काय?
शून्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,
बाकी शून्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला
तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?'
आशिष शेलारांच्या याच ट्विटला मनसेनंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेनं ट्विट करत आशिष शेलारांच्या आडून मोदी आणि शहांवर निशाणा साधला आहे. सध्या भक्त लावारिस असल्याचंही मनसेनं म्हटलं आहे. तसेच दोन नेत्यांनी भाजपाला घडवलं, पण आताचे दोन नेतेच विखारी प्रचार करून भाजपाला डुबवणार असल्याचंही मनसेनं ट्विटमधून म्हटलं आहे. मनसेनं ट्विट करत म्हटलं आहे की,
एक आणि एक दोन होतात की अकरा?
सध्या ह्याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा.
पूर्वी २ विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं,
आता २ विखारी माणसांनी भाजपला डूबवलं.
विचारांची, विवेकाची हरवली शिस्त,
आणि जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त.
#हुकलेलंमंत्रिपद
एक आणि एक दोन होतात कि अकरा?
सध्या ह्याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा.
पूर्वी २ विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं,
आता २ विखारी माणसांनी भाजपला डूबवलं.
विचारांची, विवेकाची हरवली शिस्त,
आणि जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त. #हुकलेलंमंत्रिपद
अशा आशयाचं ट्विट करत मनसेनं आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. आशिष शेलारांना भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं मनसेनं त्यांच्यावर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वीही आशिष शेलार यांनी केलेले ट्विट मनसेला चांगलेच झोंबले होते. यावर मनसेने त्यांना 'काळजी करू नका शेलार भाऊ' म्हणत त्यांना हुकलेल्या मंत्रिपदाचीही आठवण करून दिली होती.
या ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले
म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..
पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन..
बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!”,
एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” असा टोलाही शेलारांनी लगावला होता.
-----
त्यावर मनसेने मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर...
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर...
त्रिफळा उडवू मोदी-शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील...
काळजी करू नका शेलार भाऊ,
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील...