मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई, सरसकट पीक विमा मिळावा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
बुधवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, अभिजित पानसे, संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, 'सध्या राज्यात जी परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे राज्यपाल या राज्याचे पालक आहेत. त्यांच्याकडे आम्ही काही रास्त मागण्या केल्या आहेत. त्यावर राज्यपालांनी सांगितले की, राज्यात सरकार लवकरात लवकर बसलं तर बरं होईल, बऱ्याचशा तुमच्या मागण्या पुढे नेता येतील.'
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. सत्ता स्थापनेची कोंडी सुटत नसल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अन् राज्याचा कारभार राज्यपालांच्या हाती गेला आहे. अशातच राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विविध पक्षांकडून राज्यपालांकडे मागणी करण्यात येत आहे.