निरूपम यांच्या घरासमोर मनसेची निदर्शने; फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून शिवसेना - भाजपाची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 06:24 AM2017-10-31T06:24:22+5:302017-10-31T06:25:40+5:30
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसेविरुद्ध संजय निरूपम वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. फेरीवाल्यांचे समर्थन करणाºया निरूपम यांच्या घरासमोरच मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी दुकाने थाटून निषेध नोंदविला.
मुंबई : रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसेविरुद्ध संजय निरूपम वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. फेरीवाल्यांचे समर्थन करणाºया निरूपम यांच्या घरासमोरच मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी दुकाने थाटून निषेध नोंदविला.
अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील निरूपम यांच्या घरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी भाज्या आणि फळांच्या गाड्या लावून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘संजय निरूपम हाय हाय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मुंबई काँग्रेसने फेरीवाल्यांच्या बाजूने थेट दादरमध्ये मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. १ नोव्हेंबर रोजी हा मूक मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा मानस आहे. मात्र, त्याला मनसेकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
या वादात उतरलेल्या नितेश राणे यांनी पुन्हा एकदा निरूपम यांच्यावर निशाणा साधला. लहान मुलांच्या खेळण्यांवर बसलेल्या निरूपम यांचा एक फोटो टिष्ट्वट करत, ‘हम सब बच्चेही है’ असा पलटवार नितेश राणे यांनी केला.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. अनधिकृत फेरीवाल्यांना मारहाण करुन फरार झालेल्या पाच मनसे कार्यकर्त्यांना आज वाशी पोलिसांनी अटक केली.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून शिवसेना - भाजपाची कोंडी
मनसे, काँग्रेसमध्ये जुंपली असताना, भाजपा आणि शिवसेनेची भलतीच कोंडी झाली आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात थेट भूमिका मांडणे भाजपाला परवडणारे नाही, तर एकट्या मराठी मतांवर भाजपाचे आव्हान पेलणे शक्य नसल्याने शिवसेना नेते सावध आहेत. सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे, असे ते म्हणाले.