Join us  

मनसेच्या इंजिनाचे डबे सुटले...

By admin | Published: February 01, 2017 1:07 AM

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवून मनसैनिकांना अस्वस्थ केले आहे. महापालिकेची निवडणूक

- शेफाली परब-पंडित, मुंबई

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवून मनसैनिकांना अस्वस्थ केले आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू असताना नेत्यांनी नांगी टाकल्याने मनसैनिक बिथरले आहेत. ‘खळ्ळखट्याक’च्या भाषेऐवजी आता नेत्याने तडजोडीची भूमिका घेतल्याने आपले राजकीय भवितव्य धोक्यात आल्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली आहे. त्यामुळे ‘इंजिन’चे डब्बे सुटू लागले आहेत. त्यामुळे २०१७ची निवडणूक राज ठाकरे व त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.शिवसेनेत कुचंबणा होत असल्याने राज यांनी भगव्याला ‘जय महाराष्ट्र’ करीत स्वत:चा पक्ष स्थापन केला. फटकेबाज वक्तृत्व शैलीमुळे तरुणांना आकर्षित केले. त्यांची आंदोलने वादग्रस्त ठरली तरी गाजली. त्याच्या जोरावर २०१२च्या निवडणुकीत मनसेने तब्बल २८ नगरसेवक निवडून आणले. महापालिकेत काँग्रेस सर्वांत मोठा विरोधी पक्ष असला तरी आक्रमक भूमिकेमुळे मनसेचाच बोलबाला होता. प्रभावी विरोधक म्हणून मनसेची छाप होती. मात्र गेल्या दोन वर्षांत विशेषत: विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्थिरता आली. एक-एक मोहरे सोयीनुसार बाहेर पडू लागले. गेल्या वर्षभरात पक्ष पूर्णपणे ढेपाळला असून, आता युतीच्या प्रस्तावाने ही अस्थिरता आणखी वाढली आहे.मनसैनिक संभ्रमातराज भाषणात अचूक शब्द व ‘टायमिंग’साठी ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव हीदेखील खेळी आहे का, असल्यास कशासाठी, असे प्रश्न कार्यकर्त्यांना पडले आहेत. हा प्रस्ताव म्हणजे भाजपाची सुपारी असल्याचा आरोप होत आहे. त्याचबरोबर सेना व मनसे एकत्रित यावी असे मत असलेले कार्यकर्ते दोन्हीकडे आहेत. मात्र पक्ष अस्थिर असताना असा प्रस्ताव म्हणजे आपल्याच पायावर धोंडा असे काही मनसैनिकांचे मत आहे.मनसेचे गळालेले मोहरे राज ठाकरे यांच्या तळ्यात-मळ्यात भूमिकेमुळे पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ असून, सोयीनुसार पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत आहेत. माजी आमदार प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे, राम कदम भाजपात गेले. त्यापाठोपाठ प्रकाश दरेकर, भालचंद्र अंबोरे भाजपात तर ईश्वर तायडे, सुखदा पवार, गीता चव्हाण, सुरेश आवळे आणि सोमवारी चेतन कदम यांनी सेनेत प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, घाटकोपरमधून मुकुंद थोरात यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.- शिवसेनेला इतका अहंकार असेल तर तुम्ही ‘मातोश्री’वर जाऊ नका, अशी विनंती राज ठाकरे यांना केली आहे. मराठीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न पुष्कळ आहेत. त्यांची एकत्र यायची इच्छा नसल्यास युती नकोच. आमच्यात जितके बळ असेल तेवढे पणाला लावू. जनतेचा निकाल आम्हाला मान्य असेल; पण तुम्ही आता झुकायचे नाही. बस झाले. अशी भावना राजप्रेमींकडून व्यक्त होत आहे. - युतीसाठी प्रस्ताव आल्यास चर्चा करू, असे विधान करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगेच स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर पुन्हा भूमिकेत बदल करीत त्यांच्याशी हातमिळवणीचे प्रयत्न सुरू ठेवल्याने मनसैनिक नाराज आहेत.