Join us  

दादरमध्ये आता ‘मनसे’ची नजर

By admin | Published: September 25, 2015 2:46 AM

दादर परिसरातील सोनचाखळी, मंगळसुत्र चोरीसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

मुंबई : दादर परिसरातील सोनचाखळी, मंगळसुत्र चोरीसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते दादर पोलिस स्थानकात या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सरकारने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद आहे. मात्र, मनसेने बसविलेले कॅमेरे चालूच राहतील. सोनसाखळी चोरीसारख्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांचा उपयोग होणार आहे. दादरप्रमाणेच मनसेचे अन्य नगरसेवकही आपापल्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेतील, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मनसेचे स्थानिक नगरसेवक आणि पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या पुढाकाराने दादर परिसरात २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर, दादर पोलिस स्थानकात या सर्व कॅमे-यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. नगरसेवक निधीतून महापालिकेने सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्वासाठीच्या निधीतून सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. सध्या २१ ठिकाणी केवळ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र आगामी काळात वायफाय, स्पीकर आदी सोयींची त्याला जोड देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दादर परिसरात वायफाय सेवा देण्यावरुन यापूर्वी शिवसेना आणि मनसेत संघर्ष झाला होता. शिवाजी पार्क परिसरात मनसेने वायफाय यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक मुद्दे पुढे करत महापालिकेने त्याला परवानगी नाकारली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आणि मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीही झाली. अखेर शिवाजी पार्कभोवती मनसेने वायफाय सुविधा देली. पाठोपाठ शिवसेनेही मोफत वायफाय सुविधा सुरु केली.