मुंबई : शाहरूख खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा खुलासा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. चेन्नई पूरग्रस्तांना शाहरूखने कोटींची मदत दिली. मात्र, राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत केली नाही. त्यामुळे ‘दिलवाले’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोमवारी केले होते. यावर आज दुपारी राज ठाकरे यांनी पत्रक काढून बहिष्काराबाबत चित्रपट सेनेच्या भूमिकेशी फारकत घेतली. चित्रपट सेनेचे म्हणणे योग्य असले तरी ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राज यांनी बजावले. राज यांनी पत्रकात पुढील खुलासा केला, अभिनेता शाहरूख खानने चेन्नई पूरग्रस्तांना १ कोटीची मदत केली, पण तो महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना विसरला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्याचा निषेध केला आहे. त्यांचं म्हणणं योग्य आहे. महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्रालाच विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्याने ठेवली पाहिजे. अर्थात असं असलं तरी आमच्या चित्रपट सेनेने त्यासाठी त्याच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे जे आवाहन केले आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही हे मी इथे स्पष्ट करू इच्छितो, असे राज ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाहरूखच्या दिलवाले चित्रपटावर प्रेक्षकांनी बहिष्कार घालावा. चित्रपट न पाहता ते पैसे अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला द्यावेत, असे आवाहनही चित्रपट सेनेच्या वतीने करण्यात आले होते.
मनसे चित्रपट सेनेच्या भूमिकेशी पक्षाची फारकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2015 2:29 AM