Join us

मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 8:12 AM

अमित ठाकरे यांना माहीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, नितीन सरदेसाई नाराज, बैठकीला गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या यादीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल. अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती मनसे नेत्याने दिली.

राज ठाकरे यांनी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली. विधानसभानिहाय आढावा घेताना इतर पक्षांची काय स्थिती आहे. मनसे उमेदवार ती जागा जिंकू शकतात का? याचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील काही उमेदवारांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांना उमेदवारी जाहीर होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा नाराज असलेल्यांनी मनसे नेत्यांशी संपर्क साधला आहे. अशा नाराजांना उमेदवारी द्यायची का? यावर त्यांनी नेत्यांची मते जाणून घेतली, असे या नेत्यांनी सांगितले. अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह नेत्यांनी बैठकीत धरला. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेणार आहेत. 

सरदेसाई गैरहजर

अमित ठाकरे यांना माहीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. सकाळी झालेल्या बैठकीला नितीन सरदेसाई गैरहजर होते. मात्र, त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना पूर्वकल्पना दिली होती, असे या नेत्याने सांगितले. मनसेच्या पहिल्या यादीमध्ये बाळा नांदगावकर (शिवडी), शालिनी ठाकरे (वर्सोवा), स्नेहल जाधव (वडाळा), बबन महाडिक (कुलाबा), संदीप देशपांडे (वरळी), ललित धुरी (अंधेरी पश्चिम), नयन कदम (मागाठाणे) यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजू पाटील, अविनाश जाधव यांना उमेदवारी; राज ठाकरे यांची घोषणा

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार राजू पाटील यांना, तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आमदार पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते सोमवारी झाले.

राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज २४ ऑक्टोबरला भरला जाणार असून, त्यासाठी स्वत: राज हजर राहणार आहेत. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. ठाण्यातून अविनाश जाधव यांनी २०१९ मध्ये भाजपचे संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, जाधव यांचा पराभव झाला हाेता. यावेळी पुन्हा जाधव यांचा सामना केळकर यांच्याशी होणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकThane Kokan Assembly Election 2024मनसेराज ठाकरेअमित ठाकरेमाहीमनितीन सरदेसाई