“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, NCPकडून संजय राऊत उपमुख्यमंत्री हेच आता शिवसैनिकांनी पाहणे बाकी”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 06:10 PM2022-05-31T18:10:05+5:302022-05-31T18:10:47+5:30
शिवसेना नेते राष्ट्रवादीकडून होणाऱ्या शिवसैनिकांच्या कोंडीवर उघडपणे बोलत असताना, विश्वप्रवक्त्यांना आमच्या कोडींची काळजी आहे, असा मनसेने लगावला आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. यातच आता मुख्यमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) केलेल्या एका विधानाचे पडसाद आता उमटायला लागले असून, भाजप आणि मनसेने यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
खासदार सुप्रिया सुळे उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार. मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावे की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळे महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसे ठरवणार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावरून आता मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, संजय राऊत उपमुख्यमंत्री हेच आता शिवसैनिकांनी पाहणे बाकी
गजानन काळे यांनी एक व्हिडिओ शेअर करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. भविष्यात आता या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री भविष्यात नकोय, असे चित्र सध्या दिसतेय. पुढच्या काही दिवसांमध्ये सुप्रियाताई या पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतायत की काय असे चित्र आता शिवसैनिकांना पाहणे एवढच फक्त या महाराष्ट्रात बाकी आहे, अशी घणाघाती टीका गजानन काळे यांनी केली आहे.
संजय राऊतांना शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीकडून होतेय हे पाहावत नाही की काय?
विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणतात की, पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर काल परवाच तुळजाभवानीला जाऊन सुप्रियाताई म्हणतात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे मी नवस फेडायला येईल. शिवसेनेतील गजानन किर्तीकर असतील, खासदार संजय जाधव असतील, श्रीकांत शिंदे असतील नाहीतर इतर सर्व नेते ज्यापद्धतीने राष्ट्रवादी इतर आमदार खासदार आणि शिवसैनिकांची कोंडी करतेय त्याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली तरी सुद्धा ज्या विश्व प्रवक्त्यांना मनसेच्या कोंडीची काळजी आहे त्या संजय राऊतांना शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीकडून होतेय हे पहावत नाहीय की काय, असा खोचक टोला गजानन काळे यांनी लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असे सुप्रिया सुळेंचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.