"MIM ची मदत घेऊन जनाची नाही, पण...; शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं", मनसेचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:34 AM2022-06-10T11:34:38+5:302022-06-10T11:35:03+5:30
MNS Gajanan Kale And Thackeray Government : एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. त्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यानंतर आता यावरून मनसेने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
"राज्याची शोभा" होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 10, 2022
जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे.
त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.
एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ""राज्याची शोभा" होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे.जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे" असं काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.
रिंगणातील उमेदवार-
भाजपा: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक
शिवसेना: संजय राऊत आणि संजय पवार
राष्ट्रवादी: प्रफुल्ल पटेल
काँग्रेस: इम्रान प्रतापगडी