प्रियंका चतुर्वेदींवरील विधानावरुन मनसे संतापली, 'शिर'साटांना थेट इशाराच दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:13 PM2023-07-31T20:13:12+5:302023-07-31T20:27:11+5:30
ठाणे येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेतील फुटीर गटाला गद्दार म्हटलं होतं
मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना त्यांना शिवसेनेनं खासदार का केलं, याचं कारण सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी, त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दाखल देत, हे विधान केलं होतं. त्यानंतर, आदित्य ठाकरेंनी गद्दार म्हणत प्रतिक्रियाही दिली. तर, प्रियंका चतुर्वेदींनीही शिरसाटांना ट्विटरवरुन चांगलच झापलं होतं. आता, प्रियंका यांची पाठराखण करत मनसेनं शिरसाटांसह भाजपलाही सुनावलं आहे. महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे 'शिर' विकृत विचारांचं 'माठ' आहे, अशा शब्दात मनसेनं शिरसाटांवर जोरदार प्रहार केला.
ठाणे येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेतील फुटीर गटाला गद्दार म्हटलं होतं. त्यावरुन, शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वैदींवर निशाणा साधला. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांना खासदार केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शिरसाट यांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. यावरुन आता, मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शिरसाटांना चांगलंच सुनावलं आहे. तसेच, हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही दिलाय.
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील..." त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधानं करायची हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही... अशांचं 'शीर' नेत्यांनी जाग्यावर आणावे अन्यथा ते 'शीर' विकृत विचारांचं 'माठ' आहे असं महाराष्ट्रात प्रचलित होईल, असे ट्विट मनसेनं केलं आहे.
आदित्य ठाकरेंचा पलटवार
यासंदर्भात, महिला पत्रकाराकडून आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अशा लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी अद्यापही त्यांना कुणी महत्त्व दिलं नाही, असे म्हणत आदित्य यांनी शिरसाट यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच, ''गद्दार आमदारांना त्यांची किंमत कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? हा प्रश्न पडतो. याचं दु:ख देखील होतं. पण, जनता त्यांना जागा दाखवेल.''
चतुर्वेदींचा शिरसाटांवर प्रहार
संजय शिरसाट आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला असा घणाघात संजय शिरसाट यांच्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.
शिरसाटांचाही पलटवार
आपण कशा दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत. आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का मत ?असो द्यायचं. गद्दारी तर स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांशी कोणी केली ते दहा पक्ष फिरून आलेल्या कालच्या उपऱ्यांना काय कळणार ? आत्मा आणि प्रामाणिकपणा असं प्रत्युत्तर आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींना दिले आहे.