आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे होत आहे. या मेळाव्यामधून सध्याच्या राजकीय परिस्थितीतून मनसेच्या पुढील वाढचालीला दिशा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मेळाव्यात महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तसेच मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना २०२४ मध्ये वरळीतून एक सामान्य महाराष्ट्र सैनिक पराभूत करून दाखवेल, असे आव्हानही दिले.
संदीप देशपांडे म्हणाले की, त्या काळात राज ठाकरे पक्षाबाहेर पडले पाहिजेत अशी परिस्थिती निर्माण केली गेली. अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागादाखवून देण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरे सांगताहेत की मनसे संपलेला पक्ष आहे, त्यावर मी बोलत नाही. मी आज या शिवतीर्थावरून सांगतो. ज्या मनसेला संपलेला म्हणता ना त्याच मनसेचा महाराष्ट्र सैनिक तुम्हाला तुमची लायकी आणि औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी संदीप देशपांडे यांनी २०२४ मध्ये वरळीत मनसेकडून आदित्य ठाकरेंना आव्हान मिळेल, असेही स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, तुम्हाला जे मिळालं आहे ते पुण्याईनं मिळालंय. कर्तृत्वानं मिळालेलं नाही. आदित्य ठाकरे तुम्ही वरळीचे आमदार झालात ते सेटिंग लावून झालात. वरळीत सचिन अहिर, सुनील शिंदे आणि तुम्ही असे तीन तीन आमदार दिलेत. तेव्हा राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही. या पुण्याईवर तुम्ही आमदार झालात. मात्र आता २०२४ येतंय, ‘देखेंगे किसमे कितना है दम’. आज ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणताय ना, त्याच पक्षाचा एक साधा मनसैनिक तुम्हाला घरी बसवून स्वत: आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज आहे, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना दिला.
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात राज ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या भविष्यातील वाटचालीसाठी गुढीपाडवा मेळावा खूप महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार आणि राज्याच्या राजकारणावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.