Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला सांगावं, महापालिकेत जावू नका; राज ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 09:28 PM2022-04-02T21:28:42+5:302022-04-02T21:30:02+5:30
मनसे गुढीपाडवा मेळावा: अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद पाहिजे होते मग भोगा. राजकारण तुम्हाला जमतं तसं समोरच्यालाही राजकारण जमते. ते सोडणार नाहीत असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेला दिला आहे.
मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार रणशिंग फुकलं आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मला ईडीची नोटीस आली, चौकशीला गेलो. मग तुम्हाला ४ महिन्यापूर्वी नोटीस आली तुम्ही का गेला नाहीत. आता संपत्तीवर टाच यायला लागली म्हणून उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) संतापले अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.
राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले की, ईडी कारवाई व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्री सांगतात. कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं सांगता, पण पहिल्यांदा कुटुंबाला सांगावं, मुंबई महापालिकेत जावू नका. महापालिकेतील आर्थिक व्यवहार तुम्ही बघायचे. ईडीची नोटीस मलाही आलीही होती. गेलो होतो. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद पाहिजे होते मग भोगा. राजकारण तुम्हाला जमतं तसं समोरच्यालाही राजकारण जमते. ते सोडणार नाहीत असं त्यांनी म्हटलं.
तसेच आमदारांना कसली घरं वाटतात. पोलिसांना घरं द्या. आमच्या मनसे आमदाराने पहिला विरोध केला. आमदारांना घरं देऊन त्यांची फार्म हाऊस हातात घ्यावीत. आमदार-खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे. लोकांचं काम करायचं मग पेन्शन कशाला हवी? कोणत्या आमदारांनी घरं मागितली होती? मुख्यमंत्र्यांनी पाहिले काय? टेंडरमध्ये कट दिसला का? ईडीनेही कट केला. मग मुख्यमंत्री संतापले. मुंबई महापालिकेच्या यशवंत जाधव यांच्यावर धाड पडली. २ दिवस मोजत काय होते? अनेक वर्ष मुंबई महापालिकेचे पैसे खाल्ले असा थेट आरोप राज ठाकरेंनी शिवसेनेवर केला आहे.
हिंदू म्हणून आपण कधी एक होणार?
हिंदू हा हिंदू-मुस्लीम दंगलीत हिंदू असतो. तो २६ जानेवारी, १५ ऑगस्टला भारतीय असतो. महाराष्ट्रात जातीजातीत भांडणं व्हावीत ही गोष्ट शरद पवारांना हवी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जातीजातीत तेढ निर्माण व्हायला लागली. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीनं वाढवला. इतिहास वाचायचा नाही. बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट करायचं. ब्राह्मण जात पाहून त्यांनी इतिहास चुकीचाच लिहिलेला असणार असे वाद काढले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. शिवरायांनी सांगितले, जातपात गाडून एकत्र व्हावं. जातीतून बाहेर पडणार नाही मग हिंदू कधी होणार? इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात जातीचं राजकारण करणार का? जेम्स लेन कोण होता? पुस्तकात वेडं वाकडं छापून आणून त्यावर वाद काढायचा. ज्याचा या देशाशी काही संबंध नाही. तो आमचा इतिहास लिहितो. त्यावरून राजकारण तापवलं जाते. आमच्या देवतांची अब्रू आम्ही चव्हाट्यावर आणतो. कसलंच भान उरलं नाही. हिंदू म्हणून आपण कधी एक होणार? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला