मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील नदी शुद्धीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी 'रिव्हर अँथम' हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. या रिव्हर अँथममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी झळकले होते. याच मुद्द्यावरून राज यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांची फिरकी घेतली. महाराष्ट्रातील सर्व प्रश्न संपलेत, राज्यात सर्वत्र आनंदीआनंद आहे, त्यामुळे आमचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गाणं गातायतं, असे वाटतेय. माझ्या मते मुख्यमंत्री हे वर्गातल्या मॉनिटरप्रमाणे आहेत. ते शिक्षकांना आवडतात, पण मुलांचे नावडते आहेत. रिव्हर अँथममध्ये दगडावर चढून गाणं गाणाऱ्या मुनगंटीवारांना पाहून तर शोले चित्रपटातील सांबांची आठवण झाली. सुधीर मुनगंटीवार हे रजनीकांतचा 12 वा डमी वाटतात, अशी खोचक टिप्पणी यावेळी राज ठाकरे यांनी केली. Mumbai River Anthem: सरकारी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक अभिनय
तसेच राज यांनी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात आश्वासने देत फिरणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समाचार घेतला. नितीन गडकरी हे सरकारी योजनांबाबत वाट्टेल ते आकडे सांगतात. ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे साबणाचा फेस आणि नळीच घेऊन फिरत असतात. कुठेही गेले एक लाख कोटी, दोन लाख कोटींचे फुगे उडवतात. मात्र, हे सर्व प्रकल्प हाती घ्यायला सरकारकडे तेवढा निधी आहेच कुठे?, असा सवाल राज यांनी विचारला. राज यांच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनीही 'फूSSफूSSफू', असा आवाज काढून गडकरींची खिल्ली उडविली.