मुंबई: नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या घोटाळा दाबण्यासाठी जाणुनबुजून श्रीदेवीच्या निधनानंतरच्या घडामोडींना अवास्तव महत्त्व देण्यात आले, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते रविवारी शिवाजी पार्क येथील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर कडाडून टीका केली. देशात, महाराष्ट्रात काय चाललंय समजतच नाही. नीरव मोदी प्रकरण चालू होतं. अचानक श्रीदेवी गेल्याची बातमी मिळाली. नीरव मोदी हे प्रकरण मागे पडावं म्हणून श्रीदेवीचं प्रकरण तापवत बसले. श्रीदेवी असेल मोठी अभिनेत्री. पण असं काय क्रांतिकारी कार्य की तिचा पार्थिव देह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळला गेला होता?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल वाईट बोलणे चांगले नाही. मात्र, श्रीदेवीचा मृत्यू हा दारूच्या नशेत बाथटबमध्ये बुडून झाला. अशा प्रकारची व्यक्ती जेव्हा जाते, तेव्हा तिचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळतात. ही महाराष्ट्र सरकारची मोठी चूक आहे. मात्र, सरकारने एवढी मोठी चूक करूनही कोणीच काही बोलत नाही. अन्यथा इतरांच्याबाबतीत चूक झाल्यास रकानेच्या रकाने भरून येतात. मुंबईवरील 26\11 हल्ल्याच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताज हॉटेलची पाहणी करायला जाताना दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना सोबत घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. परंतु, आता सरकारविरोधात कोणीही ब्र काढायला तयार नाही. कोणत्या देशात जगतोय आपण? ही आणीबाणी नाही तर काय आहे? श्रीदेवीची बातमी जितक्या वेळा टीव्हीवर दाखवली, तितक्या वेळा न्यायमूर्ती लोयांच्या खुनाच्या बातम्या दाखवल्या का?, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.
श्रीदेवीने असं कोणतं क्रांतिकारी कार्य केलं की, तिचं पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आलं; राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 8:48 PM