मनसेने वाढवली असती शिवसेनेची ताकद

By admin | Published: February 26, 2017 03:12 AM2017-02-26T03:12:55+5:302017-02-26T03:12:55+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वांत कमी म्हणजे ७ जागा जिंकल्या. पण मनसेच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळे शिवसेनेचे अनेक प्रभागांमध्ये त्याचा फटका बसला आहे.

MNS had to increase the power of Shiv Sena | मनसेने वाढवली असती शिवसेनेची ताकद

मनसेने वाढवली असती शिवसेनेची ताकद

Next

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वांत कमी म्हणजे ७ जागा जिंकल्या. पण मनसेच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळे शिवसेनेचे अनेक प्रभागांमध्ये त्याचा फटका बसला आहे. या उभय पक्षांमध्ये झालेल्या मराठी मतांचे विभाजन भाजपाच्या पथ्यावर पडले. अनेक ठिकाणी भाजपाला आघाडी मिळाल्याने शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला, असे आकडेवारीवरून समोर येत आहे.
भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेकडे मनसेच्या युतीचा
प्रस्ताव आला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळला. अखेर मनसेने २०१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले. परिणामी, मराठी मतांचे दोन्ही पक्षांमध्ये विभाजन झाले.
२२७ प्रभागांमध्ये शिवसेनेला एकूण १४ लाख ४३ हजार ९६९ मते मिळाली. मनसेला ३ लाख ९४ हजार ६५३ मते मिळाली. भाजपाने २११ जागांवर निवडणूक लढवली़ त्यांना १३ लाख ९२ हजार ६७६ मते मिळाली. मनसेबरोबर युती झाली असती तर शिवसेनेला भाजपापेक्षा ४ ते ५ लाख अधिक मते मिळवता आली असती असे दिसून येते.
भाजपाबरोबरची २५ वर्षे जुनी मैत्री तुटल्यानंतर मनसेच्या इंजिनने शिवसेनेचा वेग वाढवला असता. शिवसेना-मनसे युतीने भाजपाची ताकद कमी करता आली असती. शिवसेनेला ११४ हा जादुई आकडा सहज गाठता आला असता.
शिवसेनेचा स्वबळावर सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला असता. मनसेची हवा ओसरली तरी काही प्रभागांमध्ये मनसेच्या स्थानिक उमेदवारांनी चांगलाच जनसंपर्क ठेवला आहे. याचा फायदा त्यांना झाला आणि शिवसेनेला काही प्रभागांवर पाणी सोडावे लागले. (प्रतिनिधी)

...तर यांचाही झाला असता विजय
- प्रभाग २२०मध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवाराला ५ हजार ९४६ अशी समान मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीचा कौल भाजपाला मिळाला. या प्रभागात मनसेला मिळालेली ७५२ मते शिवसेनेसाठी निर्णायक ठरली असती. शिवसेनेचे सुरेंद्र बगलकर विजयी ठरले असते.
- प्रभाग क्रमांक १९०मध्ये शिवसेनेला ७,९५८ आणि मनसेला ७,७६९ मते मिळाली. यामुळे भाजपाच्या शीतल गंभीर अवघ्या ४४३ मतांनी निवडून आल्या.
- मनसेतून शिवसेनेत गेलेले चेतन कदम यांच्या पत्नीला बोरीवलीतून उमेदवारी मिळाली. तिथे मनसेच्या उमेदवाराला २,२२४ मते मिळाली. भाजपा उमेदवारापेक्षा शिवसेनेच्या उमेदवाराला १,१४१ मते कमी मिळाली.
- प्रभाग क्रमांक ८४ : भाजपा - अभिजित सामंत १३४९९, शिवसेना ८८७१, मनसे ७३५१
- प्रभाग क्रमांक ७४ : भाजपा - उज्ज्वल मोडक ९७१३, शिवसेना ९२५५, मनसे २३८५

Web Title: MNS had to increase the power of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.