अहमदनगर/ मुंबई: पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली.अविनाश फवार असं या मनसे (MNS) पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती.
निलेश लंके यांच्या नोटीसला आता मनसेने देखील उत्तर दिलं आहे. निलेश लंकेंच्या ४ पानांच्या नोटीशीला मनसेने १० पानांच्या नोटीशीने उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. बेकायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर दिल्याचं ट्विट मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे.
तत्पूर्वी, निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्रुनुकसानीची १ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी थेट आमदार निलेश लंके यांच्यावर फोन करुन त्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन देखील केलं होतं.
अखिल चित्रे यांनी ट्विट करत निलेश लंके यांना इशारा दिला होता. अब्रुनुकसानीची नोटीस आहे, कि खंडणीसाठीचं पत्र, असा सवाल उपस्थित करत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं. तसेच निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज मनसेने देखील निलेश लंके यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिल्यानं राजकारण चांगलचं तापणार असल्याचं दिसून येत आहे.
निलेश लंकेच्या वकिलांची भूमिका काय?
निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर १ कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे, असं वकील राहुल झावरे यांनी सांगितलं आहे.