Join us

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकर त्रस्त; तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार?, मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 12:57 PM

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन मनसेने राज्य सरकारला काही प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

मुंबई: वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. घाटकोपर, मुलुंडपाठोपाठ वरळी, प्रतीक्षानगर, आणिक, धारावी, देवनार, शिवाजीनगर, मजास, सांताक्रूझ, गोराई आणि मागाठाणे या आगारांतील कामगारांनीही संपात सहभाग घेतला. तब्बल १००९ गाड्या आगारातच उभ्या राहिल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

पहाटेपासूनच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्याने मुंबईकर प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. प्रवाशांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यातील गाड्या विविध मार्गांवर चालविल्या. मात्र, ही सेवा तोकडी पडल्याने इच्छितस्थळी जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचा आधार घ्यावा लागला.

सदर संपावरुन मनसेने राज्य सरकारला काही प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे आणि याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे असं म्हणत बेस्ट प्रशासन झोपलं आहे का?, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

मुळातच या काँट्रॅक्टर्सच्या बसेस रस्त्यात बंद पडणं, त्यांची देखभाल नीट नसणं या तक्रारी होत्याच. या सगळ्यावर बेस्ट प्रशासनाने कधीच कारवाई केल्याचं दिसलं नाही. आणि आता तर थेट या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आणि मुंबई वेठीला धरली गेली, अशी टीका मनसेने केली आहे. तसेच आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मुंबईकर त्रस्त आहे, असा निशाणाही मनसेने साधला आहे. 

वेतनवाढ करण्यात यावी, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, बसचा प्रवास मोफत करण्याची मुभा द्यावी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी ऑगस्टपासून २ आंदोलनाचे हत्यार उपसले. डागा ग्रुप या भाडेतत्त्वावरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनात गुरुवारी 'मातेश्वरी' आणि 'हंसा' या कंपनीच्या कंत्राटी कामगारांनीसुद्धा सहभाग घेतला. 

टॅग्स :बेस्टमनसे