Join us

कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 00:02 IST

मनसेने मुंबईतील अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात आंदोलन सुरु करायचं ठरवलं आहे.

Pigeon Houses : कबुतरांची विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणाऱ्या घटकांमुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कबुतरांच्या पंखांमधून निघणारे घटक आरोग्यास घातक असल्याचा इशारा अनेकदा वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला गेला आहे. मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी कबुतरांना अनधिकृत कबुतरखान्यांच्या माध्यमातून धान्य दिले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने आता मुंबईतील अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात आंदोलन सुरु करायचं ठरवलं आहे.

पक्षांना खायला घातले की पुण्य मिळते या भावनेतून अनेकजण कबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकत असतात. हे धान्य खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कबुतरं एकत्र जमतात. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना फुप्फुसाशी संबंधित अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं आहे. कबुतरांच्या पंखासह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनियाचा आजार होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अनेकदा जनजागृती करुनही मुंबईतल्या अनेक भागात चौपाट्यांवर अशा प्रकारे कबुतरांना धान्य टाकलं जात आहे. मात्र मनसेने याविरोधात पाऊल उचललं असून अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मोहिम सुरु केली आहे.

मनसेनेच्या पर्यावरण सेनेने मुंबईत अनधिकृतपणे सुरु असलेल्या कबुतरखान्यांबाबत विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. याचे काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि पर्यावरण प्रेमींनी कबुतरांपासून होणारा हा आजार गंभीर असल्याचे सांगितले. त्यानंतर आता अशा अनधिकृत कबुतरखान्यांचे व्हिडीओ काढून ते प्रशासनापर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवा असं आवाहन मनसेने केलं आहे. यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कबुतराची वाळलेली विष्ठा आणि पंखांमधून धूळीचे कण श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसामध्ये जातात. त्यामुळे फुफ्फुसाच्या समस्या उद्भवतात. याचा अस्थमा किंवा ॲलर्जी असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा धोका ओळखून मुंबईसह अनेक महानगरपालिकांनी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली होती. यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागात मार्शल देखील नेमले होते. कोणी कबुतरांना चारा घालताना आढळून आल्यास थेट कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकामनसे