मुंबई : कोकण विभागीय आयुक्तांनी तक्रार दाखल करून घेतल्याने मनसेला बळ मिळाले आहे. या प्रकरणावर अंतिम सुनावणीला वेळ असल्याने, मनसेने ही संधी साधून पक्षात एकमेव उरलेले नगरसेवक संजय तुर्डे यांना गटनेता जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठविले आहे. त्यामुळे शिवसेना आणि पालिका प्रशासन पेचात सापडले आहे.मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेने फोडल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. शिवसेनेच्या खेळीने पालिकेतील अस्तित्वच मिटल्याने मनसे नेते खवळले आहेत. त्यामुळे हा प्रवेश बेकायदेशीर ठरविण्यासाठी मनसेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेत गेलेल्या चार नगरसेवकांच्या घरवापसीच्या वृत्तानंतर गुरुवारी मनसेने व्हिप काढून, या नगरसेवकांना महापालिकेच्या कोणत्याही सभेत मतदान करण्यास मनाई केली. मात्र, मनसेचे गटनेते दिलीप लांडे शिवसेनेत गेले असल्याने या व्हिपला अर्थच काय? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला होता.कोकण विभागीय आयुक्तांनी मनसेची तक्रार दाखल करून घेतल्याने, या सहा नगरसेवकांच्या शिवसेनेतील प्रवेशाची घोषणा लांबणीवर पडली आहे. परिणामी, कोकण आयुक्तांचा निर्णय येईपर्यंत ते मनसेचेच नगरसेवक म्हणून ओळखले जाणार आहेत. त्यामुळे मनसेने महापौरांना तत्काळ पत्र पाठवून संजय तुर्डे हे मनसेचे नवीन गटनेते असल्याचे कळविले आहे. हे पत्र महापौरांकडून पालिकेच्या चिटणीस विभागाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र, ते सहा नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या मनसेत असले, तरी मनसेसोबत नाहीत. हा पेच सोडविण्यासाठी विधि विभागाचा सल्ला घ्यावा लागणार आहे.>असा आहे तांत्रिक पेचमनसेचे गटनेते दिलीप लांडे व पाच नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे मनसेत सध्या एकच नगरसेवक आहे. मग तुर्डे गटनेते कसे ठरतात? तसेच नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या मनसेत असल्याने, संजय तुर्डेंची गटनेतेपदी घोषणा करावी लागेल का? असा पेच निर्माण झाला आहे. नियमानुसार एका पक्षात चार लोक एकत्र असतील, तर तो गट स्थापन होतो.>‘त्या’ नगरसेवकांनाही द्यावा लागणार जाबमनसेची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर, कोकण विभागीय आयुक्तांनी चिटणीस विभागाला पत्र पाठविले असतानाच, त्या नगरसेवकांना आपली बाजू कोकण आयुक्तांसमोर मांडावी लागणार आहे. या नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे यावरही या नगरसेवकांना जाब द्यावा लागणार आहे.सभा पुढे ढकललीमनसेच्या ए, बी फॉर्मवर निवडणूक लढविणाºया त्या सहा नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत ठरत नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची याचिका मनसेने कोकण विभागीय आयुक्त भारती लवंगारे यांच्याकडे केली आहे.ही याचिका कोकण आयुक्तांनी दाखल करून घेतल्याने, मनसेने शुक्रवारी पत्र पाठवून प्रभाग क्रमांक १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे यांना गटनेते जाहीर केले. त्यामुळे पेच निर्माण झाल्याने महापौर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा निर्णय लागेपर्यंत बचाव करण्यासाठी सत्ताधाºयांनी पालिकेची महासभा २३ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे.
संधी साधत मनसेने महापालिकेत नेमला नवा गटनेता, महापौरांनी पालिकेच्या चिटणीस विभागाकडे पत्र पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:48 AM