Join us  

Raj Thackeray: 'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 8:38 PM

Raj Thackeray: मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला आहे.

मुंबई: आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क वरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. दरवर्षी दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. 

गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे. आज साचलेले राजकारण दिसत आहे. मात्र त्याआधी मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला आहे. यामध्ये गेले दोन-अडीच वर्ष महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना, महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही, असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. आणि हे जर समजा तुम्हाला वाटत असेल की, हे खरं राजकारण, तर हे राजकारण नव्हे, असं राज ठाकरेंचे वाक्य या व्हिडिओद्वारे शेअर केले आहेत. 

गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली तयारी, त्यांची पुढची दिशा स्पष्ट करणारी आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापालिका निवडणूक सोपी नाही. कारण अनेक आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असे दिसत आहे. हे पहाता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपकडून पडद्याआड सपोर्ट केला जाईल, असं सांगण्यात येत आहे. 

भाजपाकडून एका ठाकरेंचा काटा दुसऱ्या ठाकरेंकडून काढण्याचे प्रयत्न केले जातील. मात्र असे राजकीय युक्तिवाद राज ठाकरे यांना मान्य नाहीत. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली, आणि शिवसेनेची आजची जी अवस्था झाली त्याला जबाबदार कोण? असा सवाल राज ठाकरेंकडून केला जातो. पाडव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणातही हेच सूत्र त्यांच्याकडून मांडले जाईल असे सांगितले जात आहे. 

टाळी एका हाताने वाजत नाही, किंवा आग लागल्याशिवाय धूर निघत नाही... या म्हणींची प्रचिती राज ठाकरे यांच्या भाषणातून येईल. तुम्ही चुका करायच्या. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे. त्यांची विचारपूस करायची नाही, पक्ष सोडून लोक जाऊ लागले की आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडायचे. हे कसले राजकारण? असा सवाल किंवा अशी मांडणी राज ठाकरे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर या तिघांची राजकीय खेळी कशी असेल याचे अंदाज बांधता येतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेभाजपादेवेंद्र फडणवीस