मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकवर मनसेनं निशाणा साधला आहे. मोदी बायोपिकला एका दिवसात सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळतं. मग मराठी चित्रपट निर्मात्यांना 50 दिवस का थांबावं लागतं?, असा सवाल मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी उपस्थित केला. मोदींवरील बायोपिकला आणि इतर चित्रपटांना प्रमाणपत्र देताना सेन्सॉरकडून वेगळा न्याय का लावला जातो, असा प्रश्न त्यांनी ट्विटरवरुन विचारला. अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेला पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विवेकनं मोदींची भूमिका साकारली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं त्याला विरोध झाला होता. यावरुन मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी ट्विट करुन टीका केली. 'सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी मोदी बायोपिकचा नवा खेळ! आज CBFCचं प्रमाणपत्र मिळवणार आणि परवा देशभरात सिनेमा प्रदर्शित होणार! मग, मराठी निर्मात्यांना हे प्रमाणपत्र मिळवायला ५० दिवस का थांबावं लागतं?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'मोदी बायोपिकला एका दिवसात सेन्सॉर सर्टिफिकेट, मग मराठी निर्मात्यांना 50 दिवस कशासाठी?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 8:01 PM