बेशिस्त भाजीवाल्यांना मनसेचा दणका
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना माटुंगा येथील निवासी क्षेत्रात सामाजिक अंतराचे भान न ठेवता कोणतीही काळजी न घेता लोकांची सुरक्षितता धोक्यात आणून रस्त्यावर अनधिकृतपणे भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांना मनसेने आज चांगलाच दणका दिला.
माटुंगा येथील सेनापती बापट मार्गावर निवासी क्षेत्रात रस्त्यावर सामाजिक अंतराचे भान न ठेवता तोंडाला मास्क न लावता लोकांची भाजी खरेदी सरासपणे सुरू होती स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर मनसेनी याची दखल घेतल्यावर भाजी विक्रेत्यानी तिथून आपला गाशा गुंडाळला.
माटुंगा येथे कोरोना सारख्या महामारी विरोधात लढा देण्यात नियंत्रण आलेले असताना दि, 24 जून पासून पहाटे भाजीचा बाजार सुरू झाल्याने तिथे गर्दी वाढू लागली. भाजी खरेदी करणाऱ्यांच्या तोंडाला मास्क नाही, सामाजिक अंतर ठेवले जात नाही तसेच तिथे होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येला तेथील रहिवाशांना तोंड द्यावे लागले. अशा परिस्थितीमुळे तिथे राहणाऱ्या स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यातून स्थानिक आणि भाजीवाले यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार रहिवाशांना भेडसवणाऱ्या या समस्यांचे निवेदन पालिका सहाय्यक आयुक्त, बाजार निरीक्षक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5, सहाय्यक पोलिस आयुक्ताना देण्यात आले असून मनसेच्या पाठपुराव्याला पालिकेने प्रतिसाद दिल्यामुळे भाजीवाल्यांनी निवासी क्षेत्रातून त्यांच्या मूळ जागी पुन्हा स्थलांतर केले असल्याचे मनसेचे दादर- माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची सुरक्षितता जपता यावी यासाठी भाजीवाल्यांचे मोकळ्या मैदानात स्थलांतर करण्यात आले होते. खुल्या मैदानात भरणारी बाजारपेठ अचानक निवासी क्षेत्रात रस्त्यावर काशी काय भरली जाते असा सवाल करत भाजी विक्रेत्याना निवासी क्षेत्रात बसू देऊ नये अशी मागणी किल्लेदार यांनी केली.