मनसे महायुतीत सहभागी होणार ? राज ठाकरे - शेलार भेटीने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 05:47 AM2024-02-20T05:47:03+5:302024-02-20T05:47:14+5:30
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील वारंवार भेटींंमुळे महायुतीत मनसेचा समावेश होणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आतापर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींचे महत्त्व वाढले आहे. आशिष शेलार यांनी सोमवारी सकाळी भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या या भेटीनंतर आशिष शेलार म्हणाले, आम्ही राजकीय मित्र आहोत, भेटत असतो. युतीबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उत्तर देताना शेलार यांनी सांगितले की, ‘मन की चर्चा झाली, जन की बात’ झाली. शेलार पुढे म्हणाले, अद्याप कोणताही राजकीय निर्णय नाही, देवेंद्रजी म्हणाले आहेत तर लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे शेलार म्हणाले.
राज ठाकरे यांनीही भाजपसोबत युतीच्या चर्चांवर मौन बाळगले असले तरी युतीच्या चर्चाही फेटाळलेल्या नाहीत. वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आयोगावरच शिस्तभंग कारवाई केली पाहिजे!
मुंबईत ४ हजार शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येते. मग मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करते? आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी. निवडणुका होणार हे आयोगाला माहीत नसते का? शिक्षकांना विनंती असेल की, कुठेही रुजू होऊ नका. मला बघायचेच आहे, कोण शिस्तभंगाची कारवाई करते.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे