शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 06:39 AM2024-11-14T06:39:11+5:302024-11-14T06:39:55+5:30
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, असे शिवाजी पार्कबाबत पालिकेचे धोरण आहे. उद्धवसेनेच्या आधी मनसेचा अर्ज आल्याने मनसेलाच सभेसाठी परवानगी मिळणार, असे दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान आपल्याला मिळणार का, याकडे मनसे आणि उद्धवसेनेचे लक्ष लागले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पक्षांनी वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानासाठीही अर्ज केला असून, १७ नोव्हेंबर रोजी त्यांना दोन स्वतंत्र मैदानांवर सभा घेण्यास एमएमआरडीएने परवानगी दिल्याचे समजते. शिवाजी पार्क मैदानाचा निर्णय अजून झाला नसला तरी हे मैदान मनसेला मिळण्याचे संकेत आहेत. मनसेने उद्धवसेनेच्या आधी अर्ज केल्याने त्यांचा मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता आहे.
प्रचार संपण्यास अवघे पाच दिवस उरले असून, अजून कोणत्याही पक्षाची शिवाजी पार्कवर जाहीर सभा झालेली नाही. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा होणार आहे. महायुतीची ही एकत्रित सभा असेल. मनसे आणि उद्धवसेनेने १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी अर्ज केला आहे.
शिवाजी पार्कचा प्रश्न अनुत्तरित असल्याने या दोन्ही पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसीतील मैदानासाठी अर्ज केला असून, या दोघांनाही सभेसाठी परवानगी मिळाली आहे. बीकेसीतील दोन स्वतंत्र मैदानावर या सभा होऊ शकतात. मात्र, एकाच दिवशी दोन पक्षांच्या सभा एकाच ठिकाणी असल्याने कायदा, सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाजी पार्कबाबत निर्णय झाल्यास हा प्रश्न निकालात निघेल. एका पक्षाची सभा पार्कात, तर दुसऱ्या पक्षाची सभा बीकेसीत होऊ शकेल.
असा होणार मनसेचा अडथळा दूर
१७ नोव्हेंबरला आम्ही शिवाजी पार्कात सभा घेणार नाही, असे पत्र भाजपच्यावतीने देण्यात आले आहे. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही सभेसाठी अर्ज केला होता. त्यांनीही आपण सभा घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, असे शिवाजी पार्कबाबत पालिकेचे धोरण आहे. उद्धवसेनेच्या आधी मनसेचा अर्ज आल्याने मनसेलाच सभेसाठी परवानगी मिळणार, असे दिसते.