मंडईच्या पुनर्विकासात मनसेची उडी

By admin | Published: January 12, 2017 06:36 AM2017-01-12T06:36:15+5:302017-01-12T06:36:15+5:30

परळमधील डॉ. शिरोडकर मंडईच्या रखडलेल्या पुनर्विकासाच्या प्रश्नामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली

MNS jump in market reshuffle | मंडईच्या पुनर्विकासात मनसेची उडी

मंडईच्या पुनर्विकासात मनसेची उडी

Next

मुंबई : परळमधील डॉ. शिरोडकर मंडईच्या रखडलेल्या पुनर्विकासाच्या प्रश्नामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. गेल्या २० महिन्यांपासून रखडलेल्या मंडईच्या पुनर्विकासाठी येथील व्यापाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी मंडईला भेट देत, व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी आक्रमक झालेल्या डॉ. शिरोडकर मंडई व्यापारी असोसिएशनने गुरुवारी मंडईच्या ठिकाणी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष लहू पडेलकर यांनी सांगितले की, शिरोडकर मंडईची जागा धोकादायक असल्याचे सांगत, २० महिन्यांपूर्वी महापालिकेने व्यापाऱ्यांना मंडईतील गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले. गाळे रिकामे करण्यास विरोध करणाऱ्यांना परवाना रद्द करण्याची भीती दाखवत, भर पावसाळ््यात गाळेधारकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, मंडईच्या ठिकाणी पर्यायी जागा देण्याऐवजी, पालिकेने सर्व गाळेधारकांना गिरगाव येथील खोताची वाडी येथे स्थलांतर केले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत दुसऱ्या बचत गटासाठी संबंधित जागा दिल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेने सर्व शिरोडकर मंडईतील गाळेधारकांना ग्रँटरोड येथील खटाववाडी येथे हलवले. खटाववाडी येथील निर्जन इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मंडई थाटण्याचा अजब सल्ला पालिकेने दिला आहे. मात्र, याठिकाणी नागरिक ढुंकूनही पाहत नसल्याने, गेल्या २० महिन्यांपासून एकही गाळेधारक त्याठिकाणी गेलेला नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली असून, याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, ग्राहक परळमध्ये असताना ग्रँटरोड येथे पर्यायी जागा देणेच चुकीचे आहे.
मंडईतील गाळेधारकांची व्यथा मांडण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गाळेधारकांची बाजू मांडण्यात येईल. मंडईच्या जागेवरील इमारत जमीनदोस्त केल्यामुळे उपलब्ध झालेल्या मोकळ््या जागेत तात्पुरता धंदा करण्याची मागणी आयुक्तांकडे केली जाईल. शिवाय पुनर्वसन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रचारात कळीचा मुद्दा ठरणार
शिरोडकर मंडईतील ९० टक्के व्यापारी हे मराठी आहेत, शिवाय येथील हजारो नागरिकांना या मंडईचा फायदा होत होता.
मंडईचे स्थलांतर झाल्याने लक्ष्मी कॉटेज, रेल्वे वसाहत, कृष्णनगर आणि नजीकच्या वसाहतीमधील रहिवाशांना लालबाग आणि दादर येथील मंडईमध्ये जावे लागत आहे.
या ठिकाणी खासदार, आमदार आणि नगरसेवक हे तिन्ही लोकप्रतिनिधी शिवसेनेचे आहेत, तरीही मंडईचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे. त्यामुळे मंडईच्या पुनर्विकासाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला अडचणीत आणू शकतो.

Web Title: MNS jump in market reshuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.