मुंबई- मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला. भोंगा आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे, असे स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत दिले.
राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली. केसेस घेऊन पक्ष वाढत नाही. दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनतां येणार नाही. मेळावे घेऊन महागाईवर बोलता येत नाही. मोदींचे कौतुक करून काय भेटणार, बृजभूषण काय तुमच्यासारखे भुमिका बदलत नाही, असा निशाणाही दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर साधला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद राज ठाकरे आणि मनसेवर टीका करत आहे. या टीकेला मनसेकडूनही प्रत्युत्तर येत आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत दीपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला आहे.
पहिले 'आपचा' हात मग 'शिवसंग्रामचा' हात आणि आता थेट 'शिवसेनेचा' हात-पाय पकडून सुद्धा तुमचा राजकीय यशाचा दौरा काय पूर्ण होईना.अहमदनगर झाले मुंब्राकळवा झाले मिळेले फक्त धुतकार म्हणून ही अशी वायफळ बडबडयची पाळी आली. दीपाली सय्यद, इतकी नौटंकी करून पण तुमचे 'आदित्यजी' काय तुम्हाला हात देईना, अशी टीका अखिल चित्रे यांनी केली आहे.
दरम्यान, एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं. तसंच हे एक आंदोलनच असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावर देखील दीपाली सय्यद यांनी टीकास्त्र सोडलं होते. पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार, हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.