मुंबई: वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. शिवसेना नेते अनिल परब यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सदर घटनेवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या घटनेवरुन मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. मग इतकी वर्ष तुम्ही कारभार सांभाळत असताना पाणी तुंबत होते त्यासाठी मग आता तुम्हाला बुडवून काढायचं का?, असा सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही पण पैसे दिलेत का? तुमच्या कार्यालयाचे पण ३ माळे चढले आहेत. तुमचे नगरसेवक नालेसफाईबाबत विविध प्राधिकरणासोबत संयुक्त बैठक घेत होते,तरी मग विभाग का तुंबत होते? छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला नितांत आदर आहे, पण आपल्या स्वार्थासाठी प्लीज त्यांचं वापर करू नये, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या स्वार्थापायी आर. जे. मलिष्का, नारायण राणे, कंगणा रणौत यांची घरं तोडली तेव्हा सगळं योग्य होतं मग आता हे चुकीचं का?,असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. नियतीचं चक्र पुर्ण करत असते. तुम्ही जे पेरलं तेच उगवणार आहे. माझ्यामते अनिल परब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते आंदोलनाचे नेतृत्व करत होते. ते पाण्याच्या प्रश्नासाठी गेले नव्हते. मारण्यासाठी गेले होते, असं म्हणत अनिल परब सरकारचा जावई आहे का?, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि विचार घेऊन आम्ही चाललो आहोत, असं शिंदे सरकार सांगतात. पण ज्या बाळासाहेबांची प्रतिमा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा शाखेत आहे, त्या शाखेला अधिकाऱ्यांनी हात लावला आहे. आता बघायचं आहे की हे शिंदे सरकार काय करावाई करतंय. जर शिंदे सरकार काही कारवाई करणार नसेल, तर त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं, असा इशारा अनिल परब यांनी दिला.