तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 02:44 PM2021-06-05T14:44:30+5:302021-06-05T14:44:52+5:30
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना एका वेबिनारमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का?, असं विचारलं असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं होतं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊतांच्या या टीकेवरुन आता मनसेनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. संजय राऊत यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे स्वत:चं राजकारण स्वत:च करतात. पण तुम्हाला मात्र निवडणुकीत राजकारण करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची गरज लागते. तसेच वारंवार आमचे दैवत परमेश्वर म्हणून त्यांच्यावर विसंबून राजकारण करतात, असा टोला देखील अखिल चित्रे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, @rautsanjay61 आपलं म्हणणं अगदे बरोबर.#राजसाहेब स्वत:चं राजकारण स्वत:च करतात पण तुम्हाला मात्र प्रत्येक निवडणुकीत राजकारण करण्यासाठी स्व.बाळासाहेबांची गरज लागते,वारंवार ‘आमचे दैवत’ परमेश्वर म्हणून त्यांच्यावर विसंबून राजकारण करता #भंपकसमनावीर
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) June 5, 2021
मनसेमुळे राज ठाकरे
पक्ष हा के वळ नेत्यामुळे नसतो. कार्यकर्त्यांचे जाळे हे महत्त्वाचे असते. नेत्यावरून पक्ष ओळखला जात नाही तर पक्षामुळे नेत्याची ओळख होते. नेत्याकडे बघून जरूर मतदान होते. पण शेवटी पक्षाची ताकद महत्त्वाची असते. मोदींकडे बघून लोक भाजपला मतदान करतात, पण शेवटी भाजपची संघटनात्मक ताकद आहेच. राज ठाकरे यांचे जे काही नेतृत्व आहे ते मनसेमुळे आहे. मनसे म्हणजे राज ठाकरे नव्हे तर मनसेमुळे राज ठाकरे आहे.
मुंबई महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील युतीबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सध्या तुमच्या हातात काहीच नाही. त्यामुळे खरंच काही सांगता येत नाही. राज्यात सध्या नेमकं कोण राजकीय विरोधक आणि कोण मित्र हेच कळायला मार्ग नाही. कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे समजत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका येईपर्यंत मनसेची वाटचाल एक पक्ष म्हणून असेल आणि हा मला डोळा मारतोय का, तो पत्र पाठवतोय का, यावर माझी वाटचाल नसेल, असंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.