मुंबई: गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन राज्यात चांगलच वातावरण तापलं आहे. मनसेने देखील अदनान सामीला पद्मश्री जाहीर केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आगामी काळात अदनान सामीला पद्मश्री देण्यावरुन मनसे आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अदनान सामीला पद्मश्री देण्यावरुन मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विरोध दर्शवला आहे. मात्र शिवसेनेने अजूनही याबाबत कोणतीही भूमिका जाहीर न केल्यामुळे मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना देशातून हाकला असं आवाहन केंद्र सरकारला केले. तसेच आगामी 9 फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा देखील राज ठाकरेंनी केली. न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यातच मनसेचा मोर्चा बघितल्यानंतर अदनान सामीसारख्या गायकाला पुन्हा पद्मश्री देण्याची हिंमत होणार नाही असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजपाला दिला आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट करुन गेल्या सहा वर्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करणं यांना जमलं नाही. पण अदनान सामीला भारताचं नागरिकत्व देऊन त्याला लगेच पद्मश्री देण्याची यांना केवढी घाई असं म्हणत टीका केली आहे. तसेच शिवसेनेला याचा साधा निषेधही करावासा वाटत नाही, याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल उपस्थित करत अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात येणाऱ्यांविरोधात राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 9 फेब्रुवारीला मनसेचा जो महाविराट मोर्चा निघेल, तो बघितल्यानंतर अदनान सामी सारख्या गायकाला पद्मश्री देण्याची हिंमत पुढच्या 10 हजार वर्षांत कोणत्याही सरकारला होणार नाही असा इशारा देखील अमेय खोपकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केला आहे. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे. अदनान सामीला पुरस्कार देणं हा देशातील जनतेचा अपमान आहे अशी टीका महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांनी केली आहे.
अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यावरुन वाद पेटला; मनसेपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केला विरोध