'पाकिस्तानी कलाकार दिसला, तर...'; मनसे पुन्हा आक्रमक, बॉलिवूडला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:34 PM2022-11-17T12:34:47+5:302022-11-17T12:35:22+5:30
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत बॉलिवूडला इशारा दिला आहे.
मुंबई- भारतात काम करणाऱ्या विशेषत: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. याआधी पुलवामा याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनेपाकिस्तानी कलाकार आणि गायकांना भारतात काम करण्याविषयी विरोध केला होता. आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी पुन्हा एकदा या विषयावर ट्वीट करत इशारा दिला आहे.
अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले की, बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय. फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला, तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील, असं अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 16, 2022
उरी दहशतवादी हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी कलाकारांना मनसेकडून असा इशारा देण्यात आला होता. पुढच्या ४८ तासांत सर्व पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून आपल्या देशात जावं, नाहीतर आम्ही त्यांना मनसे स्टाइलनं पळवून लावू, असं मनसेनं म्हटलं आहे. आता पुन्हा एकदा मनसेकडून असाच इशारा देण्यात आल्याने बॉलिवूडविरोधात मनसेचे 'खळ्ळखट्याक' पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"